Sunday, February 27, 2011

माई: एका चंदनाचे आयुष्य

माईने ह्या जगाचा निरोप घेऊन आज एक वर्ष झाले. काळ कोणासाठी थांबलाय? पण कधी कधी एखादे जुने गाणे ऐकले, रेडिओचा काळ आठवला, जुनी पुस्तके वाचनात आली की माईची तीव्र आठवण येते. मन विषण्ण होते. माणसे जातात पण ती आपल्याबरोबर आपला काळसुद्धा घेऊन जातात ह्या जाणीवेने खरंतर मन जास्त व्याकुळ होते. माई आपल्याबरोबर आपला काळ घेऊन गेली. तो काळ आता कध्धी कध्धीच येणार नाही. त्या काळातल्या आठवणी जतन करणे हेच काय ते आता करू शकतो. म्हणूनच ह्या ब्लॉगची निर्मिती. एक वर्षापूर्वी ती गेली तेंव्हा ई-सकाळ वर तिच्यावर जो लेख मी लिहिला होता, सर्वप्रथम तोच इथे उधृत करीत आहे.
_______________________________________________
साधारणपणे पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट असेल. कासारवाड्या मध्ये एका लहानशा घरात तेंव्हा आम्ही रहात होतो. नुकताच श्रावण संपत आला होता. पिवळ्या धमक फुलांनी लगडलेल्या झेंडूच्या असंख्य झाडांनी परसदार भरून गेले होते. त्यावर फुलपाखरे भिरभिरत होती आजूबाजूच्या मुलांचे अनुकरण करण्याचे माझे ते वय होते. हळूच एखादे फुलपाखरू पकडून वहीच्या पानांमध्ये ठेवण्याचा उद्योग सुरु होता. तितक्यात माई तिकडून आली. शनिवारची सकाळची शाळा संपवून ती घरी येत होती. घरी येताच तिने मला आत बोलाविले आणि वही उघडून दाखवायला सांगितली. कोवळी नाजूक फुलपाखरे आत निपचित पडली होती. माईच्या डोळ्यात आसवे भरून आली. चेहऱ्यावर अपार कारुण्य दाटून आले आणि ती बोलली, "मुक्या जिवांशी असा खेळ करायचा नसतो". मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. ती शिकवण इतकी प्रभावी झाली कि पुढे आयुष्यभर कधी तिचा विसर पडला नाही.

माईने आम्हा भावंडाना लहानपणापासून असे भूतदयेचे व परोपकाराचे धडे दिले. माई जशी आमची आई होती तशीच ती आमच्या शाळेत आम्हाला शिक्षिका म्हणूनही होती. अतिशय सोप्या पद्धतीने विषय समजून सांगण्यात तिचा हातखंडा होता. वर्गात कधीही कुणावर ती ओरडली नाही वा हात उगारला नाही. किंबहुना तिच्या शिकविण्याच्या पद्धतीमुळे तिच्यावर कधी तशी वेळही आली नाही. पाठ्यपुस्तकातील शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांवर चांगल्या संस्काराची गरज असते असे तिला कळकळीने वाटत असे. आपले वडील व गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठाच्या संस्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे कै. व्ही. आर्. जाधव (सर्) ह्यांचा विद्यादानाचा वारसा तिने आपल्या जीवनात पुढे चालविला. ह्यामध्ये माझ्या वडिलांची परिपूर्ण साथ तिला मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा ह्या छोट्याशा गावातील श्री शाहू कुमार भवन हायस्कूलमध्ये गेल्या चाळीस वर्षांत असंख्य विद्यार्थी माईने घडविले. उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक ह्या पदांवर कार्य करतानाच घरी मात्र ती एक साधी गृहिणी होती. जेवण धुणी-भांडी यांसारखी घरातील कामे तर ती करीत असेच पण आपल्या विचारसरणीमुळे गाव आणि परिसरातल्या असंख्य स्त्रियांमध्ये तिने आदर व विश्वासाचे स्थान निर्माण केले होते. कसल्याही सोयी-सुविधा नसलेल्या एका गावी छोट्या भाडोत्री घरात कंदिलाच्या उजेडात व चुलीच्या धुरात संसार थाटून माईने सुरवात केली. आयुष्यभर चंदनासारखे झिजून तिने तो संसार फुलविला. अपार कष्ट घेतले. त्याची परिणीती पुढे अनेक वर्षांनी चांगले दिवस तिने पाहीले. काही महिने परदेशात राहून आली. भारतभर फिरून पाहिला आणि शेवटी स्वत:च्या मालकीची काही घरे असलेल्या व सुना-नातवंडानी भरलेल्या कुटुंबातून ती निघून गेली.

भूतदया आणि कारुण्य हा तिचा स्थायीभाव होता. एकदा एका पावसाळ्यात एक फिरते कुटुंब आमच्या घराच्या वळचणीला आश्रयाला आले होते. त्या दिवशी अगदी मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यापासून आपला बचाव करण्यासाठी त्या कुटुंबाची प्रयत्नांची पराकाष्टा सुरु होती. त्यांची ती धडपड पाहून माईचे मन द्रवले. तिने त्या नवरा बायकोला व त्यांच्या छोट्या दोन मुलांना घरी बोलावून त्यांना धीर दिला व पाउस कमी होताच मोजके कपडे, अंथरूण, पांघरूण देऊन त्यांची रवानगी केली. असे कितीतरी हृदय स्पर्शी प्रसंग मी माझ्या बालपणी अनुभवले आहेत. कुणाला दुखवू नये, कुणाशी भांडू नये आणि इतरांची दु:खे वाटून घेऊन सर्वांप्रती मनात सतत करुण्याभाव जतन करावा अशी तिची धारणा होती. तेच संस्कार तिने आपल्या सर्व विद्यार्थ्यांवरही केले.आपल्या मुलांनी खूप शिकले पाहिजे आणि कुणाच्या मदती शिवाय स्वबळावर स्वत:ला घडविले पाहिजे असे तिला मनोमन वाटत असे. त्या प्रेरणेतून आम्हा तिघा भावंडांच्या जीवनाला दिशा मिळाली आणि म्हणूनच कि काय, वीज पाणी अशा मुलभूत सुविधा सुद्धा नसलेल्या त्या गावात बालपण गेलेले आम्ही तिघे पुढे जीवनात चांगले स्थिरस्थावर झालो. तीच कथा माईच्या इतर अनेक विद्यार्थ्यांची आहे.

आज माई केवळ देहाने आमच्यात नाही म्हणून तिला श्रद्धांजली वगैरे वाहण्याचा प्रकार मनाला पटत नाही. तिचे विचार व तिच्या जाणीवा आमच्यात जागृत आहेत व म्हणूनच ती आमच्यात जिवंत आहे ह्यात शंकाच नाही. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीला तिने हरविले पण लढता लढता झालेल्या वारांमुळे घायाळ होउन ती अखेर धारातीर्थी पडली. त्या वेदनांतून तिला मुक्ती मिळाली. म्हणून "माई-मंदिर" ची उभारणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यात ग्रामीण भागातील तिच्या शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता वाचनालय आणि अभ्यासिका यांचा समावेश असेल. तिच्या जीवन व विचारातून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवावे हाच त्यामागचा आमचा मानस आहे